यंत्रसामग्री वाटप उपक्रमातून महिला सक्षमीकरणाला बळ — आमदार प्रसाद लाड आणि सौ. नीता प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाला वेग
पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी एक महत्वाचा टप्पा पार पडला असून, आमदार श्री प्रसाद लाड साहेब आणि सौ नीता प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’च्या माध्यमातून राहुल लक्ष्मण जाधव यांनी सायन कोळीवाडा तसेच प्रभाग क्र. १७३ मधील महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटी यंत्रसामग्रीचे वाटप करणे चालू केले आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व आमदार श्री प्रसाद लाड यांचे स्वीय सहायक तथा भाजपा युवा मोर्चा मुंबईचे जिल्हाध्यक्ष (मिडिया) श्री राहुल लक्ष्मण जाधव यांनी केले. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक माताभगिनींना स्वतःच्या घरातून व्यवसाय सुरू करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि कौशल्यविकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम आजच्या काळाची गरज असल्याचे मत श्री राहुल जाधव यांनी व्यक्त केले. उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि पुढील व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक असलेल्या मदतीबाबत त्यांनी प्रत्यक्ष चर्चा केली.
आमदार श्री प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘महिला आर्थिक सक्षमीकरण’ अभियानाला स्थानिक पातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यामुळे सायन कोळीवाडा व परिसरातील महिलांसाठी रोजगाराचे नवे दरवाजे उघडणार आहेत.
स्थानिक नागरिक व महिला भगिनींनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून, “हा उपक्रम म्हणजे महिलांसाठी नवीन आत्मनिर्भरतेचा मार्ग” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमातून अनेक कुटुंबांचे आर्थिक चित्र बदलण्यास मदत होणार असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक प्रभावी पाऊल ठरणार आहे.