रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) कडून प्रभाग क्रमांक 176 मधील रस्त्यावरील समस्यांवर तातडीची दखल घेण्याची मागणी :राजेंद्र काशीराम मांजळकर
मुंबई : प्रभाग क्र. 176 मधील सायन कोळीवाडा परिसरातील विविध रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) दक्षिण मध्य मुंबई सचिव राजेंद्र काशीराम मांजळकर यांनी परिरक्षण विभाग, मुंबई महानगरपालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी नोंदवली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सायन कोळीवाडा–मुकुंदराव आंबेडकर रोड, रस्त्याची स्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासह, नागरिकांचे जीवित धोक्यात येत आहे. विशेष करून विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि रुग्णवाहिकांना या दुर्धर रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शासनाकडून आजवर कोणतीही ठोस दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
निवेदन महापालिकेकडून स्वीकारण्यात आले असून लवकरच कामे सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.