प्रारुप मतदार यादीतील दुबार नावांवर काटेकोर छाननी; निवडणूक तयारीसंदर्भात मुंबई महापालिकेची उच्चस्तरीय बैठक
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भातील प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाहीसाठी महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार, कोकण विभागाच्या अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) श्रीमती फरोघ मुकादम, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी (मुंबई उपनगरे) श्रीमती अर्चना कदम व उपनिवडणूक अधिकारी (मुंबई शहर) श्री. शामसुंदर सुरवसे उपस्थित होते.
यावेळी परिमंडळ उप आयुक्त, प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच प्रारुप मतदार यादीतील हरकत व सूचना कामकाजासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बैठकीत प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीत आढळणाऱ्या दुबार (समान) नावांवर कार्यवाही कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. प्रत्येक विभाग (वॉर्ड) स्तरावर स्थापित मदत केंद्रांवर दुबार नावांची यादी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अशा सर्व मतदारांची पडताळणी करण्यासाठी घरोघरी (डोअर टू डोअर) सर्वेक्षण करण्याचा निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आला.
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात ही बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
या बैठकीमुळे आगामी निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी आणि अचूक मतदार यादी निर्मितीसाठीची तयारी अधिक बळकट झाली असल्याचे मत प्रशासकीय व निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.