१६ जिल्ह्यांना ३९ कोटी ५६ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला:मंत्री विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर व गडचिरोली
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार आतापर्यंत १७१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पुन्हा आता विभागीय आयुक्तांमार्फत १६ जिल्ह्यांना ३९ कोटी ५६ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणाऱ्या निधीसंदर्भात कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी चर्चा केली.