ताजी बातमी

मुंबईची घनता ही सर्वाधिक व त्यानंतर पुणे असल्याने कोरोनाचे सर्वाधिक पेशंट हे मुंबईत व नंतर पुण्यात सापडत आहेत. या पेशंटवर ससून व महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलसह अन्य हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. सुरवातीच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांच्या मदतीने या पेशंटवर उपचार करण्याची जबाबदारी पार पाडली. आजही पेशंटची संख्या वाढत असताना डॉक्टरांसह या सर्वच स्टाफच्या कामाचे तासही वाढले आहेत. शिवाय कोरोना पेशंटच्या थेट संपर्कात येत असल्याने अनेकांना घरीही जाता येत नाही. तरीही हे सगळेजण आरपारची लढाई लढत आहेत.


मी ससून व नायडूसह राज्यातल्या अनेक हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या संपर्कात होतोच. पण आज या दोन्ही हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या सर्व कोरोना योध्यांना भेटलो. त्यांच्या अडचणी, अनुभव जाणून घेतले. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर त्यांना क्षणोक्षणी येत असलेले थरारक अनुभव ऐकून मी मनोमन या योध्यांना सलाम केला. त्याग काय असतो? धैर्य म्हणजे काय? समर्पण म्हणजे काय हे सगळं मला या दोन्ही हॉस्पिटलमध्ये या कोरोना योध्यांमध्ये मला प्रत्यक्ष पहायला मिळालं. घरी असलेल्या छोट्या-छोट्या मुला-मुलींनाही त्यांना भेटता येत नाही. चिमुकल्यांना मोबाईलवर पाहून आणि बोलूनच त्यांना आपल्या प्रेमाची भूक ऑनलाइन भागवावी लागतेय. काही जणांच्या वयस्कर आईवडलांनाही फोनवरच पहावं लागतंय. पण रुग्णालयात येणारा प्रत्येक पेशंट कोरोनाला हरवून बरा होऊन स्वतःच्या पायाने घरी जावा, या एकाच ध्येयाने हे सर्वजण लढत आहेत. 


काही दिवसांपूर्वी ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून मी नायडू हॉस्पिटलमधील नर्स व अन्य स्टाफ यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी तुम्हाला लवकरच भेटायला येणार असल्याचा शब्द दिला होता. हा शब्द पाळता यावा आणि या कोरोना योध्यांना भेटून आधार द्यावा, हिम्मत द्यावी, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि आपल्या परीने जे शक्य आहे ते सहकार्य करावं या हेतूने मी आज नायडू हॉस्पिटलला भेटलो. म्हसवड (जि. सातारा) येथील #माणदेशीफाऊंडेशन च्या माझ्या मित्रांनी या दोन्ही हॉस्पिटलमधील कोरोना वॉरियर्ससाठी PPE किट, गॉगल व N95 मास्क दिले होते. हे साहित्य हॉस्पिटल प्रशासनाकडे सुपूर्द केलं आणि त्या सर्वांचे मनापासून आभार मानले.


यावेळी 'दादा' म्हणून भावाप्रमाणे हक्काने आवाज देत इथल्या वॉचमनपासून तर डॉक्टर, नर्स, स्वच्छता व कर्मचारी आणि इतर स्टाफ हे सर्वजण माझ्याशी संवाद साधत होते. यावेळी आपोआपच आपल्यावरची जबाबदारी वाढल्याची जाणीवही होत होती. कोरोनाच्या पेशंटला सेवा देताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या डॉक्टर व अन्य सेवकांचीही मी यावेळी भेट घेतली. आमचा कोरोना कधी बरा होतो आणि आम्ही पेशंटची सेवा करायला कधी जातो, असंच या सर्वांचं म्हणणं आहे. एखाद्या विजेत्यासारखी त्यांची ही भाषा ऐकून माझीही छाती अभिमानाने भरली. 


आणखी एक गोष्ट म्हणजे नायडू हॉस्पिटलमध्ये मला डॉ. रविशा मोरे आणि डॉ. चारुता श्रोत्रीय या दोघी भेटल्या. या दोघींसह डॉ. आदित्य लाल आणि डॉ. वितांशा हे सर्वजण गेल्या दोन महिन्यांपासून इथे विनामोबदला सेवा देत आहेत. त्यांची ही सेवावृत्ती पाहून तर मी थक्कच झालो. काही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केल्याची उदाहरणं आपण पाहिली पण इथे कोरोनाच्या पेशंटला मोफत सेवा देणारे देवदूतही आहेत, हिच आपली ताकद आहे आणि त्याच बळावर आपण कोरोनाच्या महामारीला परतवून लावल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे. 


दरम्यान, 'ऍक्युरेट गेजिंग'चे मालक विक्रम साळुंखे यांनी संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरुन स्मार्ट व्हेंटिलेटर बनवलाय. तो पहाण्यासाठीही मी गेलो होतो. गेली दोन महिने अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांना हे यश मिळालं आणि लवकरच त्याची ट्रायलही सुरू होईल. विशेष म्हणजे सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत हा व्हेंटिलेटर सुमारे निम्म्या किमतीतच उपलब्ध होईल, असा त्यांचा अंदाज आहे. असं नाविन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या या संशोधकालाही माझा सलाम.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात