इमारतीवरून उडी मारून वृद्धेची आत्महत्या
मुंबईत आत्महत्यांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. शनिवारी सकाळी पवईमध्ये एका ७१ वर्षीय महिलेने १९ व्या मजल्यावरून उडी मारली. मृदुला भट्टाचार्य असे या महिलेचे नाव असून मानसिक आणि कौटुंबिक तणावातून तिने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.
उच्चभ्रू वस्ती असलेल्या हिरानंदानी परिसरातील नोरिटा टॉवरमध्ये मृदुला या आपल्या कुटुंबियांसह राहत होत्या. सकाळी साडेनऊच्या सुमारास घराच्या खिडकीतून मृदुला यांनी उडी मारली. जोरदार आवाज झाल्याने सुरक्षारक्षकाच्या ही बाब लक्षात आली. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत पवई पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. प्रथमदर्शनी संशयास्पद असे काही दिसत नसले, तरी आत्महत्येमागील निश्चित कारण समजू शकलेले नाही.