११ रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण!
मध्य रेल्वेवरील तब्बल ११ रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्था आणि उद्योगपतींनी पुढे येऊन भारतीय रेल्वेच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. शनिवारी भायखळा स्थानकात सौंदर्यीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी गोयल बोलत होते.
'आय लव्ह मुंबई' आणि रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने १६६ वर्षीय जुन्या भायखळा रेल्वे स्थानक सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, ठाणे, मुंब्रा, आंबिवली, वाशिंद, निळजे, चुनाभट्टी, डोंबिवली या स्थानकांचेही सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
स्थानक सौंदर्यीकरणासाठी स्वयंसेवी संस्था, विकासक यांचा सामाजिक दायित्व निधी (सीआरएस) वापरण्यात येणार आहे. यापैकी बहुतांशी ठिकाणी कामे मंजूर झाली असून पावसाळ्यात तातडीने स्थानकांच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्याचे आदेश रेल्वेमंत्री गोयल यांनी मध्य रेल्वेला दिले आहेत. भाजपा नेत्या शायना एन. सी. यांची 'आय लव्ह मुंबई' ही संस्था आणि बजाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा स्थानकाचे काम करण्यात येईल. वेळे आधी हे काम पूर्ण होईल, असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.