भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा, कार्यकाळ संपण्यापूर्वीच सोडले पद
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ 6 महिन्यांनंतर संपुष्टात येणार होता. त्यांच्या राजानाम्याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु, कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा देऊन त्यांनी सरकार विरुद्ध आरबीआयच्या वादास पुन्हा चर्चेत आणले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, उर्जित पटेल आरबीआयचे गव्हर्नर असताना 2016 मध्ये त्यांना डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती देण्यात आली होती. 2018 मध्ये त्यांनी सरकार विरुद्ध आरबीआयवर दिलेले भाषण चांगलेच चर्चेत आले होते.
ल्लेखनीय बाब म्हणजे, रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या धोरणांमध्ये मतभेदाच्या चर्चा सुरू असतानाच उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. मोदी सरकारने त्या ठिकाणी शक्तीकांत दास यांना आरबीआयच्या गव्हर्नर पदी नियुक्ती दिली. शक्तिकांत दास यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि नियुक्तीवरून देखील वाद झाला होता. पटेल यांचे अतिशय जवळचे अधिकारी असलेले आचार्य त्याचवेळी आपले पद सोडतील अशी चर्चा होती. गेल्या वर्षभरात आरबीआयमध्ये राहूनही त्यांनी सरकारच्या धोरणांवर जाहीररित्या आणि अंतर्गत बैठकांमध्ये टीका केली होती. विरल आचार्य यांनी पुढे काय करणार यावर अद्याप काहीही जाहीर केले नाही. आरबीआयमध्ये येण्यापूर्वी ते न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक होते.