गतिमंद तरुणीवर शेजाऱ्याचा बलात्कार
कुटुंबीय मतदानासाठी घराबाहेर असल्याची संधी साधत गतिमंद तरुणीवर शेजारीच राहणाऱ्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना आग्रीपाडा परिसरात सोमवारी घडली. आग्रीपाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून नराधमालाअटककेली.
आग्रीपाडाच्या मुसा किल्लेदार मार्गावरील पालिका वसाहतीला लागूनच झोपडट्टीचा परिसर आहे. या परिसरात २४ वर्षीय गतिमंद तरुणी ही आपल्या आई-वडिलांसोबत राहते. सोमवारी दुपारच्या वेळेस तिचे आईवडील मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. यावेळी ही तरुणी एकटीच होती. आईवडील घरात नसल्याने ती घराबाहेर बसली होती. ती एकटी असल्याचे पाहून अनिल (३०) याने तिला आपल्या घरात बोलविले आणि तिच्यावर बलात्कार केला. आईवडील मतदान करून घरी परतल्यानंतर या तरुणीने हातवारे करून हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईवडिलांनी मुलीला घेऊन आग्रीपाडा पोलिस ठाणे गाठले. आग्रीपाडा पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत अनिलला अटक केली. अनिल हा सलूनमध्ये काम करतो. तरुणी आणि तिच्या घरच्यांना ओळखतो, असे पोलिसांनीम्हटलेआहे.