फाशी रद्द करून निर्दोष सुटका
नाशिक जिल्ह्यातील सातपूर येथे तीन वर्षांपूर्वी मायलेकाच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी रामदास शिंदे याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्दबातल ठरवली. इतकेच नव्हे तर सरकारी पक्षाला आरोप निर्विवादपणे सिद्ध करता आलेले नाहीत, असे निरीक्षण नोंदवून रामदासला संशयाचा फायदा देत उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तताही केली.
'पत्रकार कचरू संसारे हे त्यांच्या पत्नी पल्लवी व (३२) व मुलगा विशाल (६) यांच्यासोबत रंगनाथ शिंदे यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहत होते. १७ एप्रिलच्या रात्री कचरू हे रात्रपाळीच्या कामासाठी घराबाहेर गेलेले असताना रंगनाथ यांचा मुलगा रामदास संसारे यांच्या खोलीत गेला आणि त्याने पल्लवीकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे रामदासने रागाच्या भरात चाकूने पल्लवीवर तब्बल २८ तर विशालवर २४ वार केले', असा आरोप होता. पोलिसांनी याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून खटला भरला होता. मायलेकाची अत्यंत निर्दयपणे हत्या केल्याने हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्याचा प्रकार असल्याचा निष्कर्ष नोंदवून नाशिक सत्र न्यायालयाने रामदासला गेल्या वर्षी २६ एप्रिलला फाशीची शिक्षा ठोठावली होती.
मात्र, या शिक्षेविरोधात रामदासने अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत अपिल केले, तर फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी राज्य सरकारने हा विषय उच्च न्यायालयात मांडला. त्यानुसार, न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणी घेऊन ३ एप्रिलला राखून ठेवलेला आपला निर्णय मंगळवारी जाहीर केला.