मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना दिलासा SRA कडून ९७,३६८ सदनिकांचे हस्तांतरण पूर्ण
मुंबई : मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (SRA) यांच्याकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून तब्बल ९७,३६८ सदनिकांचे हस्तांतरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या पात्र कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत ही महत्त्वाची प्रक्रिया राबविण्यात आली. विविध प्रकल्पांअंतर्गत बाधित झालेल्या नागरिकांना सुरक्षित, हक्काची आणि सन्मानाने राहणीमान देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सदनिका वितरित करण्यात आल्या असून, यामुळे हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. शासनाच्या लोकाभिमुख धोरणांमुळे आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे ही प्रक्रिया शक्य झाली आहे.
या उपक्रमामुळे केवळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनच झाले नसून, मुंबईतील नियोजनबद्ध शहरी विकासाला देखील चालना मिळाली आहे. पुढील काळातही अशाच प्रकारे पारदर्शक व प्रभावी पद्धतीने पुनर्वसन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.