महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ : निष्पक्ष व पारदर्शक प्रक्रियेसाठी राजकीय पक्षांसोबत आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका मुख्यालयात आज विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. गगराणी यांनी निवडणूक प्रक्रियेतील प्रशासकीय, तांत्रिक व कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देत, आगामी निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणा पूर्णतः कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. लोकशाही मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व विश्वासार्ह राहण्यासाठी राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माननीय राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. विजयकुमार सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नामनिर्देशन प्रक्रिया, अर्जांची छाननी, हरकती नोंदवणे, निवडणूक प्रक्रियेतील दैनंदिन कामकाज तसेच मतदार जनजागृती मोहिमेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच जात वैधता प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, जोडपत्र १ व जोडपत्र २, उमेदवार प्रतिनिधी नियुक्ती आदी मुद्द्यांवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे प्रशासनाकडून सविस्तर निरसन करण्यात आले.
या बैठकीमुळे आगामी महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.