जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट भंडाऱ्याने पेट घेतल्याने १७ जण भाजल्याची भीती
जेजुरी (ता. पुरंदर): जेजुरी शहरात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान एक गंभीर दुर्घटना घडली. उमेदवारांचे औक्षण करताना आरतीच्या ताटातील ज्योतीमुळे हवेत उधळलेल्या भेसळयुक्त भंडाऱ्याने अचानक पेट घेतला. या आगीत जवळपास १६ ते १७ नागरिक भाजल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विजयी मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. औक्षणाच्या वेळी भंडारा उधळण्यात आला असता, त्यात ज्वलनशील घटक असल्याने आरतीच्या ज्योतीच्या संपर्कात येताच आगीचा भडका उडाला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा फटका बसला.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे सण-समारंभ आणि मिरवणुकांमध्ये भंडाऱ्याच्या वापराबाबत सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. भंडाऱ्यात भेसळ होती का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.