मुंबई महापालिकेसाठी महायुती सज्ज! दादरच्या ‘वसंत स्मृती’ त शिवसेना–भाजपची पहिली समन्वय बैठक
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांची पहिली समन्वय बैठक दादर येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात उत्साहात पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावण्याचा आणि महायुतीचाच महापौर बसवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेना उपनेते तथा खासदार राहुल शेवाळे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, गृहराज्यमंत्री योगेश कदम, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर तसेच शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतलताई म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान मुंबईतील सध्याची राजकीय स्थिती, प्रभागनिहाय रणनिती, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे कसे उतरायचे यावर सविस्तर चर्चा झाली. महायुती सरकारच्या विकासकामांचा आढावा घेत, तोच विकासाचा अजेंडा मुंबई महानगरपालिकेतही प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला.
या बैठकीमुळे मुंबईच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, महापालिका निवडणुकीसाठी महायुती पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. शिवसेना–भाजप यांचा समन्वय आणि एकजूट हीच आगामी निवडणुकीत विजयाची गुरुकिल्ली ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.