वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विशेष रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांनी दत्तक घेतलेल्या रस्त्यांवर सखोल स्वच्छता, पाणी फवारणी, मिस्टिंग मशीनचा वापर यासह धूळ नियंत्रण उपाय प्रभावीपणे अमलात आणले जाणार आहेत.
महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (पर्यावरण) अविनाश काटे व उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत ही मोहीम राबवली जाईल. बोरिवली (पूर्व), मालाड (पश्चिम), अंधेरी (पूर्व), देवनार, माझगाव, कुलाबा, मुलुंड (पश्चिम) व पवई या उच्च AQI असलेल्या भागांमध्ये विशेष स्वच्छता उपाययोजना करण्यात येणार आहेत.