बृहन्मुंबई महापालिकेची जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे–२०२५ जाहीर
बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील जाहिरात व्यवस्थापन अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक करण्यासाठी ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे – २०२५’ जाहीर केली आहेत. २७ नोव्हेंबर २०२५ पासून ही तत्त्वे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहेत.
नवीन नियमांनुसार पदपथ आणि इमारतींच्या गच्चीवर जाहिरातींना परवानगी देण्यात येणार नाही. तसेच ४०x४० फूटांपेक्षा मोठे होर्डिंग्स लावता येणार नाहीत. डिजिटल जाहिरातींच्या प्रकाशमानतेवर मर्यादा घालण्यात आली असून लुकलुकणाऱ्या जाहिराती पूर्णपणे बंदीस्त राहतील.
याशिवाय प्रथमच ‘व्ही’, ‘एल’ आकार, तसेच त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी आणि षटकोनी स्वरूपाच्या जाहिरात फलकांना वाहतूक विभागाच्या मंजुरीनंतर परवानगी देण्यात येणार आहे.
ही सुधारित तत्त्वे न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीच्या शिफारसी आणि नागरिकांच्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आली असून सर्व जाहिरातदारांनी त्यांचे काटेकोर पालन करावे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.