रविवारी सायंकाळी काही निवांत क्षण मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी फेरफटका मारला: गृहमंत्री अनिल देशमुख
आपली मुंबई ही महाराष्ट्राची शान तर आहेच, पण एक समृद्ध वारसा देखील जपतेय.
सध्या संपूर्ण जगासह आपल्या महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपले पोलीस डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, स्वछता दूत अहोरात्र लढा देत आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी स्वतः अनेक जिल्ह्यांचा राज्यव्यापी दौरा केला. गेल्या ४ महिन्यांपासून महाराष्ट्र पोलीस फ्रंटलाईनवर योध्यासारखे लढत आहेत. त्यांचा कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मी सातत्याने बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांशी संवाद साधत असतो.
काल सायंकाळी मरीन ड्राइव्ह वर निवांतपणे फेरफटका मारला. यावेळी बंदोबस्तावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना देखील भेटलो. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. या संवादातून मनात एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं. इतक्या दिवसांच्या सततच्या कामामुळे आलेली मरगळ क्षणार्धात दूर झाली. या संवादने मला काम करायला आणखी प्रेरणा व ऊर्जा दिली. लवकरच कोरोना विरोधातील हे युद्ध आपण जिंकू आणि कोरोनामुळे आपल्या गतीला बसलेला हा अल्पविराम बाजूला सारून आपण पुन्हा नव्या जोमाने उठू, दुप्पट गतीने नक्की पुढे जाऊ, असा मला विश्वास आहे.