पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक : उपमुख्यमंत्री अजित पवार
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करून देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे, असं सूचित केलं. पुणे जिल्ह्यात २ लाख ३० हजार ९३७ हेक्टर क्षेत्राचं खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आलंय. यात भात, बाजरी, मका, नाचणी, सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी २६ हजार क्विंटल बियाणांची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार थेट बांधावर खते कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्या, यात हयगय करू नये. कृषी निविष्ठाबाबत भरारी पथकाच्या माध्यमातून लक्ष ठेवणं आवश्यक असून यामध्ये जादा दरानं विक्री होणार नाही तसंच याबाबत शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही, या दृष्टीनं जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सतर्क रहावं. कृषी विभागानं बियाणे उपलब्धतेबाबत आणि त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावं. बियाणांची उगवणक्षमता दर्जेदार असावी. शेतकऱ्यांना खते व पिक नियोजन सुलभ होण्याच्या दृष्टीनं माती परिक्षण महत्त्वाचं असून शेतकरी ते ग्राहक थेट बाजारव्यवस्था उभारणीबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. दुरूस्ती अभावी बंद ट्रान्सफार्मरची अडचण तसंच शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याशिवाय खत मागणी व पुरवठा, कृषी निविष्ठा विक्रेत्यांची संख्या, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांसाठी नमुन्याचे नियोजन, संनियंत्रणासाठी स्थापन केलेली भरारी पथके, संनियंत्रण कक्ष, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, उन्नत शेती, समृध्द शेती, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, खरीप-रब्बी पीक कर्जवाटप, विंधन विहीर दुरूस्ती, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना इत्यादीचा सविस्तर आढावा घेतला.