देहविक्रय व्यवसायातील महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरविण्याचे निर्देश दिले: महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत लॉकडाऊनमुळे या महिलांचे उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देहविक्रय व्यवसायातील महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील या व्यवसायातील सुमारे साडेबारा हजार महिलांपर्यंत पोहोचत त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था राज्य शासनाने केली आहे.