अनिस इब्राहिमच्या हस्तकाला अटक
डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ आणि गँगस्टर अनिस इब्राहिम याचा हस्तक मोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईद याला खंडणीविरोधी पथकाने सोमवारी केरळमधील विमानतळावरून अटक केली.
हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी अनिसचा हस्तक रामदास रहाणे याने धमकाविल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करीत खंडणीविरोधी पथकाने चार आरोपींना अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दुबई येथे राहणारा मोहम्मद सईद हा अनिसचे व्यवहार सांभाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिस सईदच्या मागावर होते. सोमवारी सईद दुबईहून केरळमध्ये येणार असल्याचे समजताच खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्याला विमानतळावरून अटक केली.