डान्सबारकडे दुर्लक्ष भोवले
मुंबईमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या डान्सबारकडे दुर्लक्ष करणे पाच पोलिसांना चांगलेच महागात पडले. बोरिवलीच्या कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव पिंपळे यांच्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांना याप्रकरणी सोमवारी निलंबित करण्यात आले.
बोरिवली पूर्वेकडील भागात अनेक बारमध्ये बेकायदा अश्लील नृत्य सुरू होते. त्यातच हे सर्व बार रात्री उशिरापर्यंत सुरू असायचे. यासंदर्भात स्थानिकांनी अनेक तक्रारी केल्या. मात्र कस्तुरबा पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. याची गंभीर दखल उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी घेतली. तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत बारना अभय दिल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव पिंपळे, निरीक्षक अनंतराव हाके, उपनिरीक्षक चेतक गांगे आणि कॉन्स्टेबल शिवाजी चिकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.