भेंडी बाजारात आग; दोन महिला ठार
भेंडी बाजार परिसरातील पंजाब महल या इमारतीला गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत दोन ज्येष्ठ महिलांचा मृत्यू झाला. नफिसा सल्लाउद्दीन (६८) आणि फरीदा मास्टर (७०) अशी मृत महिलांची नावे असून या आगीत अकराजण जखमी झाले. जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. दाटीवाटीच्या परिसरामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागला. इमारतीमध्ये अडकलेल्या सात ते आठ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
भेंडी बाजारात परिसरातील बोहरी मोहल्ला भागात असलेल्या पंजाब महल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून रात्री साडेदहाच्या सुमारास धूर येऊ लागला. यावेळी एका एसीचा कॉम्प्रेसर फुटला आणि धुराचे रूपांतर आगीच्या ज्वालांमध्ये झाले. लाकडी साहित्य, इलेक्ट्रिक वायर, कपडे यामुळे आगीने अल्पावधीत रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या फायर इंजिन, टँकर्स अशा सुमारे बारा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग लागतच चार मजली इमारतीमधील बहुतांश रहिवासी बाहेर पडले मात्र प्रचंड धुरामुळे काहीजण आत अडकल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांना लक्षात आले. आगीमध्ये अडकलेल्या सात ते आठ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. या कारवाईदरम्यान अकरा जणांना धुरामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या जखमींमध्ये चंद्रशेखर गुप्ता (३६) आणि पुंडलिक मांडे (२७), रमेश सरगर (३५) या अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे.