यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर दोन महिने बंदी
पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या काळासाठी राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांद्वारे मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही, असा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने जारी केला आहे.
जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. तसेच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी टाळणे शक्य होते. त्यामुळे सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.