शिक्षकांचे वेतन रखडले
आरे कॉलनी येथे पालिकेचे शाळा संकुल आहे. पालिकेच्या नव्या नियमांनुसार बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात आली आहे. या शाळा संकुलालाही बायोमेट्रिक हजेरीचे मशीन लावण्यात आले आहे. मात्र येथे नेटवर्कची समस्या असल्यामुळे त्याची नोंद होत नाही. अखेर हजेरी पुस्तकावर हजेरी नोंदविली जाते. परिणामी पालिकेने या शिक्षकांचे वेतन अदा केलेले नाही. यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात वारंवार खेटे घालावे लागत आहेत. या संकुलातील शिक्षकवर्ग प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहे. आदिवासी पाड्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन अशा तांत्रिक अडचणींमुळे रोखणे चुकीचे असल्याची भावना शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. घरकर्जाचे हप्ते व उन्हाळी सुट्टीत बाहेरगावी जाण्याचा खर्च या सर्वाचा ताळेबंद करताना शिक्षकांची दमछाक होत आहे.