ताजी बातमी

वैद्यकीय सेवा आणि तपासणी करण्यासाठी रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकडून दंडवसुली करणारे बोगस क्लीनअप मार्शल रॅकेट सायन रुग्णालयात सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. कचऱ्यासाठी ठेवलेल्या डब्यात थुंकणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकाकडून बेकायदा दंडवसुली करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने याबाबत तपासणी केली. सायन पोलिसांनी याप्रकरणी नुकतीच एका भामट्याला अटक केली असून त्याने अशाप्रकारे अनेकांकडून दंडवसुली केल्याचे उघडकीस आले आहे.

विमानतळावर लोडर म्हणून नोकरी करणारे मेहबूब अब्दुल शेख हे नियमित आपल्या पत्नीला वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात घेऊन जातात. २३ एप्रिल रोजी ते पत्नीसोबत सायन रुग्णालयात गेले. पत्नी सोनोग्राफीसाठी रांगेत उभी होती. मेहबूब यांना मावा खाण्याचे व्यसन असल्याने ते त्यांनी बाजूला जाऊन मावा खाल्ला आणि जवळच असलेल्या कचऱ्याच्या डब्यात ते थुंकले. हे पाहून एक इसम त्या ठिकाणी आला त्याने आपण पालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असून आम्हाला थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी नियुक्त करण्यात आल्याचे त्याने सांगितले. या ठिकाणी थुकण्यास मनाई आहे असे सांगून त्याने बाराशे रुपये दंड भरण्यास सांगितले. या इसमाने मेहबूब यांच्याकडून चारशे रुपये घेतले आणि गायब झाला. मेहबूब यांनी त्यांच्या मित्राला हा सर्व प्रकार सांगितला. आरोग्य विभागाचे अधिकारी किंवा क्लीनअप मार्शल अशी कोणाचीच या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली नसल्याचे त्याने मेहबूब यांना सांगितले.

सायन रुग्णालयातील पालिकेच्या नियंत्रण कक्षात मेहबूब आणि त्याच्या मित्राने याबाबत कळविले. रुग्णालय प्रशासन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून रुग्णालय परिसरातून निखिल पाटील नाव सांगणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. याचवेळी श्रवण मंडल या तरुणाने माझ्याकडूनही पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आल्याची तक्रार केली. रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती सायन पोलिसांना दिली. सायन पोलिसांनी याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत या इसमाला अटक केली. त्याच्या खिशात पालिकेचे बनावट ओळखपत्र सापडले तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडून उकळलेले पैसेही जप्त करण्यात आल्याचे सायन पोलिसांनी सांगितले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात