बँक अधिकाऱ्यासह सहा जणांना जन्मठेप
बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक ऑफ इंडियाच्या मांडवी शाखेतून अडीच कोटी रुपयांची क्रेडिट फॅसिलीटी घेत अडीच कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज एका बँक अधिकाऱयासह एकूण सहा जणांना चक्क जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आर्थिक गुन्हे प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होणे ही दुर्मिळ घटना आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी या गैरव्यवहाराप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या मांडवी शाखेचे तत्कालीन सहाय्यक महाव्यवस्थापक भगवानजी जोशी, कर्ज घेणारे मनोहरलाल आहुजा आणि त्यांचा मुलगा अमित तसेच या व्यवहारासाठी खोटी कागदपत्रे तयार करणाऱया महेश बोहरा, संदेश नागे आणि शांतीलाल चौहान यांना दोषी ठरविले होते. आज त्यांना शिक्षा सुनावताना या सर्वांना त्यांनी जन्मठेप दिली. खोटी कागदपत्रे तयार करणारे हे तीन आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशी कागदपत्रे तयार करून अनेक बँकांना गंडविले आहे.