पोलिसाने वाचवले वृद्धांचे प्राण
इमारतीला लागलेल्या आगीतून ‘वाचवा वाचवा’ असे शब्द कानी पडताच, पोलीस उपनिरीक्षक रमेश आंबेडकर यांनी जीवाची पर्वा न करता आवाजाच्या दिशेने धाव घेतली. दरवाजा तोडून, अंथरुणाला खिळलेल्या भावाला खांद्यावर घेत, त्याच्या बहिणीला हाताने आधार देत बाहेर काढले. खांद्यावरूनच त्यांना खाली आणत, समोरच्या इमारतीत सुखरूप पोहोचविल्याने या दोन भावंडांना जीवनदान मिळाले. स्थानिक रहिवाशांनी वरिष्ठांना पत्र लिहून अधिकाऱ्याचे आभार मानले आहेत.
बांगूरनगरच्या एव्हरशाइन नगरातील साईअमर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शनिवारी सायंकाळी आग लागली. ज्वलनशील वस्तू असल्याने ही आग अल्पवधीत भडकली. या घटनेची माहिती मिळताच बांगूरनगर पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग लागलेल्या वरील मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये रणबीर कौर (६७) आणि तिचा भाऊ रणजीत सिंग (६५) हे दोघे राहत होते. रणबीर ही फ्लॅटच्या खिडकीमध्ये येऊन मदतीसाठी आरडाओरड करत होती. ती इमारतीमधून बाहेर येऊ शकत होती, मात्र अर्धांगवायू झालेल्या भावाला चालताही येत नव्हते. आग वरच्या मजल्यावर पोहोचण्याआधी या दोघांना बाहेर काढणे गरजेचे होते. त्यामुळे कोणताही विचार न करता घटनास्थळी पोहोचलेल्या आंबेडकर सर्वत्र धूर पसरला असतानाही जिन्यावरून दुसरा मजला गाठला. मागच्या बाजूने असलेला दरवाजा तोडून ते आत गेले. अर्धांगवायू झालेल्या रणजीत यांना खांद्यावर उचलले आणि रणबीर यांचा हाथ पकडून लागूनच असलेल्या इमारतीमध्ये नेले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यानंतर या दोघांना सुखरूप खाली आणले. कार्यतत्परतेमुळे दोन वृद्ध भावंडांचे प्राण वाचवल्याबद्दल गृहनिर्माण सोसायटीने पोलिसांचे आभार मानले असून, पोलिस आयुक्तांनाही याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.