मराठवाड्याचा टँकरवाडा का झाला?
आजचे राज्यकर्ते विरोधक होते तेव्हा मराठवाड्याच्या विकासावरून रान उठवले जायचे... आज तेच काम कालचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक करत आहे. गोदावरीचे अर्धे खोरे, जायकवाडीसारखे मोठे प्रकल्प उशाशी असताना वर्षांतील दहा महिने मराठवाड्याचा घसा कोरडाच राहातो. कधीकाळी सुजलाम असलेला हा प्रदेश आणि ऊसतोड कामगार आणि स्थलांतरीत मजुरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. कृष्णा खोऱ्यातील ३१ टीएमसी पाणी मिळणार या आशेवर दोन पिढ्या जगल्या, पण पाणी आलेच नाही. जलयुक्त शिवारच्या नावाखाली नद्यांची पात्रे रुंदावून पावसाळ्यात ती काठोकाठ भरली की सरकार त्याची जाहिरात करणार. पण पावसाळा संपताच ती नदी आणि ते शिवार पुन्हा कोरडेठाक! लोकांना पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा, बेरोजगारांच्या हाताला काम हवंय आणि नेते राष्टÑवादाचा ठोस पाजून जाताहेत. मराठवाड्यातील जनतेलाही आता याची सवय झाली आहे. त्यामुळे ‘मराठवाड्याचा टँकरवाडा का झाला?’ या प्रश्नाचे उत्तर कुणीच देत नाही.