ताजी बातमी

शैक्षणिक वर्ष सध्या संपले असून, अनेक शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील अशा शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या पालकांची माहिती शाळेतील रजिस्टरमधून घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी एकाला आणि खार पोलिसांनी त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. मुंबईतील प्रवेशफसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांत त्यांचा सहभाग आढळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सांताक्रूझ येथे राहणाऱ्या एका पालकाला मुलाला प्रवेश देण्याच्या भूलथापा देऊन एक लाखाची फसवणूक करण्यात आली. त्यांच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गावकर, उपनिरीक्षक संजय सरोळकर आणि कॉन्स्टेबल सुशांत पवार यांच्या पथकाने तांत्रिक आणि इतर पुराव्यांच्या आधारे आनंद भूपती घोष याला अटक केली, तर याआधी खार पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक लोणकर यांच्या पथकाने आनंदचा साथीदार मेहफूज अहमद शेखला अटक केली. दोघांच्या चौकशीमध्ये त्यांनी सांताक्रूझ, खार, जुहू, जे.जे. मार्ग या ठिकाणी अनेकांना फसविल्याचे उघड झाले आहे. यांच्या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मेहफूज आणि त्याचा साथीदार प्रवेश सुरू असलेल्या शाळेत जायचे. याठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकाला पैसे देऊन किंवा नकळत रजिस्टरमधील पालकांच्या नोंदींचा मोबाइलमध्ये फोटो काढायचे. या पालकांना संपर्क करून प्रवेशाची हमी दिली जायची. सरकारच्या नियमानुसार डोनेशन घेता येत नसल्याने सांगत ते वैयक्तिक खाते क्रमांक देत. अशाप्रकारे अनेक पालकांनी त्यांना लाखो रुपये दिल्याचे समोर आले आहे. आनंदने स्वत:च्या आणि वडिलांच्या नावावर अनेक बँक खाती केवळ पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी उघडली होती. यासाठी त्याने पूर्वी भाड्याने राहत असलेल्या घरचा पत्ता दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अशाप्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात