९९ वर्षांचा अभिमान! महाडच्या स्मृतीदिनी ५५ कोटींच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त २० मार्च २०२६ रोजी शासनस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी तब्बल ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत वर्धापन दिन सोहळा व भूमिपूजन कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. या ऐतिहासिक स्थळाचे जतन, संवर्धन आणि आधुनिक सोयी-सुविधांसह विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनिल वारे, सहसचिव सोमनाथ बागुल, सहायक आयुक्त सुनिल जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तहसीलदार महेश शितोळे तसेच संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम, अभिवादन सोहळे, विचारपर परिसंवाद आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. चवदार तळ्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचे पर्यटनदृष्ट्या आकर्षक व प्रेरणादायी स्थळ म्हणून रूपांतर करण्याचा शासनाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाडच्या भूमीतून समतेचा व मानवाधिकारांचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक चळवळीच्या स्मृतीदिनी होणारे हे भूमिपूजन सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीतील नवे पर्व ठरणार आहे.