वडाळ्यात महाराष्ट्र शासनाच्या जागेवर बिनधास्त अनधिकृत बांधकाम! प्रशासन झोपेत नागरिक संतप्त
मुंबई : वडाळा हिम्मत नगर, विद्याअलंकार महाविद्यालय रोड मुंबई–३७ येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जागेवर खुलेआम सुरू असलेले अनधिकृत बांधकाम हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सदर ठिकाणी काही समाजकंटकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या जागेवर अतिक्रमण करत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकाम सुरू केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असताना देखील संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे.
या अनधिकृत बांधकामामुळे शासनाच्या मालमत्तेचे मोठे आर्थिक नुकसान होत असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
विशेष म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू होती तरीही असे अतिक्रमण होत असणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण मानले जात आहे स्थानिक नागरिकांनी तात्काळ बांधकाम पाडून टाकावे, दोषींवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
प्रशासन जागं होणार की अनधिकृत बांधकामांना मूकसंमती देणार?