महिला उमेदवार रिंगणात, पण कसोटी कामाची! प्रभाग १७५ मध्ये जनतेचा कौल महत्त्वाचा
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७५ मध्ये यंदा निवडणुकीचे वातावरण तापले असून, ३९,७१५ मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रभागात २२,०८० पुरुष, १७,६२६ महिला आणि ९ इतर मतदार असून हा प्रभाग केवळ आकड्यांचा नसून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या समस्यांचा महासागर बनला आहे.
पाणी टंचाई, कचऱ्याचे वाढते ढिगारे, कोलमडलेली सांडपाणी व्यवस्था आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. निवडणुका येतात, घोषणा होतात, पण प्रत्यक्षात समस्या ‘जैसे थे’ अशीच जनतेची भावना आहे.
यंदा हा प्रभाग महिला राखीव असल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी महिला उमेदवार रिंगणात उतरवल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशा विविध पक्षांचे उमेदवार मतदारांच्या दारात पोहोचत आहेत. मात्र, जनता आता पक्षचिन्ह किंवा नाव पाहणार नसून, प्रत्यक्ष काम करणारी उमेदवार कोण हे पाहणार असल्याचा ठाम सूर नागरिकांमधून उमटत आहे.
“घोषणांपेक्षा सुविधा महत्त्वाच्या आहेत. पाणी येणार का? कचरा वेळेवर उचलला जाणार का? रस्ते चालण्यायोग्य होतील का? याची उत्तरे देणारी उमेदवारच निवडून येईल,” अशी स्पष्ट भूमिका मतदार व्यक्त करत आहेत.
प्रभाग १७५ विकायला नाही, तर विकासासाठी मतदान करायचे आहे, असा निर्धार अनेक नागरिक बोलून दाखवत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक ही केवळ उमेदवारांमधील लढत नसून जनतेच्या अपेक्षा विरुद्ध राजकीय आश्वासने यांच्यातील खरी कसोटी ठरणार आहे.
कोणाचं पारडं जड होणार, हे कुणी ठरवणार नाही…
या वेळी निर्णय जनताच घेणार आहे.
जागृत, संघटित आणि सजग मतदारच प्रभाग १७५ चा खरा विजेता ठरणार, अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.