महापालिका निवडणूक २०२५-२६ : निवडणूक प्रशिक्षणास उपस्थिती बंधनकारक गैरहजेरीवर फौजदारी कारवाईचा इशारा
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशिक्षण सत्रास अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून, गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मतदान केंद्राध्यक्ष (PRO), सहायक मतदान केंद्राध्यक्ष (APRO), मतदान अधिकारी (PO) तसेच अन्य कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सत्र सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ ते शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ तसेच सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ ते शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ या कालावधीत दोन टप्प्यांत पार पडणार आहे.
प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, आदर्श आचारसंहिता, मतदान व मतमोजणीची कार्यपद्धती, कायदेशीर बाबी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी, गोंधळ अथवा गैरप्रकार टाळून निवडणूक पूर्णतः विश्वासार्ह व पारदर्शक ठेवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणाची तारीख, वेळ व स्थळ याबाबतची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र नियुक्ती आदेशाद्वारे कळविण्यात आली आहे. कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षणास अनुपस्थिती मान्य केली जाणार नाही. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या किंवा आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम २८ (क) अन्वये फौजदारी कारवाईसह शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असा कठोर इशारा प्रशासनाने दिला आहे.
निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन प्रशिक्षणास उपस्थित राहून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.