ताजी बातमी




नवी दिल्ली | प्रतिनिधी

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे गेल्या तीन दिवसांत आयोजित #महाराष्ट्रखाद्यमहोत्सव – २०२५ ने केवळ महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा खमंग दरवळ पसरवला नाही, तर ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा प्रभावी राजकीय व सामाजिक संदेशही राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला. दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवाचा नुकताच यशस्वी समारोप झाला.

कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधील ‘उमेद’ योजनेअंतर्गत कार्यरत महिला स्वयंसहाय्यता गटांचा सक्रीय सहभाग. अमरावती, जळगाव, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, बीड आणि नागपूर येथील प्रशिक्षित महिलांनी पारंपरिक व घरगुती खाद्यपदार्थांचे सादरीकरण करत महाराष्ट्राची समृद्ध ग्रामीण संस्कृती दिल्लीकरांसमोर प्रभावीपणे मांडली.

या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले असून, राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरण धोरणांची प्रभावी अंमलबजावणी दिसून आली. महिलांनी निवासी आयुक्त आर. विमला यांनी दिलेल्या संधीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करत, “या उपक्रमामुळे आमच्या ग्रामीण स्वप्नांना पंख मिळाले” अशी भावना व्यक्त केली.

समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी तसेच ‘उमेद’च्या महिलांचे विशेष कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोळपते, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राजधानी दिल्लीत महाराष्ट्राच्या अस्मितेला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि महिला सशक्तीकरणाला बळ देणारा हा महोत्सव म्हणजे राज्याच्या सर्वसमावेशक विकास धोरणाचा ठळक राजकीय संदेश ठरला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात