महापरिनिर्वाण दिनात समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांच्या पुढाकाराने २०,००० चपात्यांचे अन्नछत्रासाठी योगदान
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो अनुयायी शिवाजी पार्क येथे अभिवादनासाठी भेट देत आहेत. या अनुयायांच्या सेवेसाठी प्रभाग क्र. १७२ मधील नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांनी आणि स्थानिक महिलांनी एक अनोखा उपक्रम राबवला.
अनुयायांच्या भोजनासाठी अन्नछत्रात २०,००० चपात्यांचे भव्य योगदान करण्यात आले. विशेष म्हणजे, या चपात्या तयार करण्याच्या कार्यात नगरसेविका शिरवडकर यांनी स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवत समाजसेवेची निस्वार्थ भावना प्रत्यक्ष कृतीतून दाखविली. स्थानिक महिलांसह त्यांनी दिवस-रात्र कष्ट घेत हा उपक्रम यशस्वी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी असलेली कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांप्रती निष्ठा—यांचे हे भावपूर्ण प्रतिबिंब ठरले. महापरिनिर्वाण दिनी सेवाभावाची ही उज्ज्वल परंपरा समाजात प्रेरणा देणारी ठरत आहे.