समाजरक्षकांना मानाचा मुजरा विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये ‘शिवराज प्रतिष्ठान – राज्य पोलीस सेवा मंडळ’ तर्फे सन्मान आणि लॅपटॉप वाटप
महाराष्ट्र पोलिसांच्या अखंड निष्ठा, कठोर परिश्रम आणि समाजरक्षणातील महत्वपूर्ण योगदानाला सलाम करत महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा मंडळ आणि शिवराज प्रतिष्ठान, धानोरी – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांचे मनोबल वाढविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.
रोजच्या धावपळीमध्ये, आव्हानात्मक परिस्थितीतही नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या पोलिसांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून समाजरक्षणातील त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा देण्यात आला.
शासकीय कामकाज अधिक सुकर, वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी पोलिसांना लॅपटॉपचे वाटप करून कार्यक्षेत्रातील आधुनिकतेकडे एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तांबे साहेब तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना दिलेला हा सन्मान केवळ प्रेरणादायीच नव्हे तर लोकहिताचा एक अनुकरणीय उपक्रम ठरला आहे.