भिवंडीत साई धाब्यावर बेकायदा कब्जा प्रकरणी वासू शेट्टी व प्रदीप शेट्टीवर गुन्हा दाखल; दोन्ही आरोपी फरार
भिवंडी (प्रतिनिधी) – भिवंडीतील साई धाब्यावर जबरदस्ती कब्जा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी हक्क हस्तांतरित केल्याच्या गंभीर प्रकरणात वासू किट्टान्ना शेट्टी आणि प्रदीप वासू शेट्टी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शिवराम करिया शेट्टी (वय ५८, रा. पुणे) यांच्या तक्रारीवरून भिवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 582/2025, भादवि कलम 468, 465, 471, 420, 506 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.
फिर्यादी शिवराम शेट्टी हे माटुंग्यातील प्रसिद्ध क्लासिक हॉटेलचे मालक असून त्यांनी १९९६ साली मौजे वडपे (ता. भिवंडी, जि. ठाणे) सर्वे नं. ९१/३ मधील एकूण २७.९ गुंठे जमीन कायम खरेदीखताद्वारे विकत घेतली होती. तत्पश्चात १९९७ पासून त्या जागेवर साई ढाबा हे हॉटेल सुरू केले आणि २०१० मध्ये बार चालू केला.
शेट्टी पुण्यात व्यवसायस्थ झाल्याने भिवंडीत येणे कमी झाले. याचा फायदा घेत आरोपी वासू शेट्टी—जो फिर्यादीचा मेहुणा असून ढाब्यात मॅनेजर म्हणून कार्यरत होता—आणि प्रदीप शेट्टी यांनी संगनमत करून बनावट नोटरी संमतीपत्र, खोट्या सह्या आणि फर्ज़ी कागदपत्रे तयार केली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी Gram पंचायतमध्ये घरपट्टी आपल्या नावावर करून घेतली, तसेच टोरंट पॉवरचा वीजमीटरही आरोपी क्रमांक १ वासू शेट्टीच्या नावावर ट्रान्स्फर केला.
याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे परवाने नूतनीकरण करताना फिर्यादीच्या नावाने खोट्या सह्या करून दस्तऐवज सादर केल्याचेही उघड झाले आहे. आरोपींनी साई ढाबा स्वतःच्या ताब्यात ठेवून नफा स्वतःकडे ठेवला व मूळ मालकाची आर्थिक फसवणूक केली, असे तक्रारीत नमूद आहे.
या गंभीर फसवणूक, दस्तऐवज बनावट व हडप प्रकरणी दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.