सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील विकासाचा नवा अध्याय : आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन
मुंबई : सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील मनपा प्रभाग क्रमांक १७३मधील प्रतिक्षा नगर येथील पंचशील नगर परिसरात आज विविध विकासकामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांच्या निधीतून या परिसरातील काँक्रीटीकरण, पायवाटा व गटारे बांधकाम अशा अत्यंत आवश्यक कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या कामांमुळे परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावत असलेल्या चिखल, दुर्गंधी व पाणी साचण्याच्या समस्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक नागरिकांनी आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांचे आभार मानत विकासाची गती कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भुमिपूजन कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते, नागरिक, महिला मंडळ प्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांनी सांगितले,
“सायन कोळीवाडा मतदारसंघातील प्रत्येक गल्लीपर्यंत विकास पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही.”
या भूमिपूजनानंतर पंचशील नगर परिसरातील नागरिकांमध्ये नव्या विकासाची उमेद आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.