माजी महापौर महादेव देवळे यांची कोरोनावर मात
मुंबई - मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे यांना दीर्घकाळानंतर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (केडीएएच) मधून सोडण्यात आले आहे. यापूर्वी कर्करोगातून वाचलेल्या आणि सध्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या महादेव देवळे यांचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. सतत झोप येणे, सुस्तपणा येणे व मानसिक संभ्रम वाटणे ही प्राथमिक लक्षणे असलेल्या देवळे यांना प्रत्यक्षात ‘कोविड-19’ची लागण होऊन त्यात गुंतागुंत निर्माण झाली होती. त्याचा परिणाम त्यांची फुफ्फुसे, मेंदू व हृदय यां व इतर अवयवांवर झाला होता. देवळे यांच्यावर ‘कोविड-19’चे विविध स्वरुपाचे, तसेच स्ट्रोक, हृदयविकार यांचे उपचार करून ‘न्यूरो-रिहॅबिलिटेशन’ केल्याने त्यांच्या प्रकृतीत यशस्वी सुधारणा झाली. त्यांच्या रुग्णालयातील 20 दिवसांच्या मुक्कामात ‘व्हेंटिलेटर’ चे आणि इतर प्रगत स्वरुपाचे उपचार करण्यात आले.
‘केडीएएच’ मधील न्यूरोसायन्स केंद्रातील कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ.अन्नू अग्रवाल म्हणाल्या, “ज्या रुग्णांमध्ये स्ट्रोक किंवा सीझर यांसारखी न्यूरोलॉजिकल लक्षणे आढळतात, अशा सर्व रूग्णांना कोविड-19 झाल्याची शंका येणे क्रमप्राप्त आहे. कोविड-19 चे लवकर निदान करणे महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरुन रुग्णांना रासायनिक आणि मेकॅनिकल ‘क्लॉट बस्टर’ सारखे प्रभावी उपचार वेळेवर देता येतील."