खासगी दवाखान्याची बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षक नेमा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना
सोलापूर : कोविड विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची खासगी दवाखान्यातील बिले लेखा परीक्षकांकडून तपासून घेतल्यावरच रुग्णांना दिली जावीत. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखा परीक्षक नियुक्त करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिल्या
सोलापुरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी श्री. टोपे बोलत होते. बैठकीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. जिल्हा नियोजन कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली.
श्री. टोपे यांनी सांगितले, खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. मात्र आता खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षक तपासेल. शासनाच्या नियमानुसार योग्य आहे का याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जाईल. शासनाने निश्चित केलेले दर केवळ कोरोना उपचारासाठी नाही तर सर्वच रोगांवरील उपचारासाठी आहेत