गोट बँकेचा उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवेल – मंत्री यशोमती ठाकूर
मुंबई, दि. १७: माविमच्यावतीने सुरू करण्यात येत असलेला गोट बँकेचा उपक्रम अतिगरीब महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल. शेळीपालनातून होणाऱ्या कमाईतून चलन फिरते राहिल्यामुळे उपजीविकेला हातभार लागण्यासह जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी बांबूपासून बनविलेल्या आकर्षक राख्यांचे उद्घाटन करताना या पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती हे कोविड परिस्थितीत संकटातून संधी कशा प्रकारे निर्माण करता येतात याचे उत्कृष्ट उदाहरण होय, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
अकोला, अमरावती आणि पालघर जिल्ह्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात येत असलेल्या ‘गोट बँक’ उपक्रमासाठी राज्य शासनाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि कारखेडा कृषी उत्पादक कंपनी, अकोला यांच्यामध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. तसेच बांबूपासून निर्मित राख्यांच्या सचित्र यादीपुस्तकाचेही (कॅटलॉगचे) उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभार्थी महिलांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी राज्यमंत्री बच्चू कडू ऑनलाईनरित्या तर मंत्रालयात श्रीमती ठाकूर यांच्यासह माविमच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी, कारखेडा कृषी उत्पादक कंपनीचे संचालक नरेश देशमुख उपस्थित होते.