पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगानं आढावा बैठक
पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगानं आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त तसंच मनपा आयुक्त, महापौर, जिल्हाधिकारी यांसह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत स्राव तपासणी क्षमता, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, वैद्यकीय पार्श्वभूमी, वॉर्डनिहाय रुग्ण संख्या, कंटेन्मेंट झोन निहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, ग्रामीण भागातील स्थिती तसंच उपचार सुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीनं चाचण्यांची क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्यादृष्टीनं पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी १२ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश दिले आहेत. कोविड -१९ स्राव नमुना तपासणीसाठी लागणा-या साधनसामुग्रीसाठी ८ कोटी ९० लाख ९७ हजार रूपयांचा तर, यंत्रसामुग्रीसाठी ३ कोटी ५३ लाख ६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी ७ कोटी १५ लाख ८१ हजार रूपयांचा निधीही देण्यात आला आहे. या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला असल्याचंही स्पष्ट केलं. बैठकीत कोविड -१९ चाचण्यांचे अहवाल वेळेत देण्याचे निर्देश दिले. कोविड -१९ स्राव नमुने तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांसाठी आवश्यक मनुष्यबळ महापालिका प्रशासनानं तातडीनं उपलब्ध करून द्यावं, असं सूचित केलं. ससून, नायडू, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्या तसंच मृत्यू संख्येची माहिती अद्ययावत होत असल्याची खात्री प्रशासनानं करावी. कोविड आणि इतर आजारांच्या रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आलेत. कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीनं कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अत्यावश्यक बाबींसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून खर्च करावा तसंच ससून रुग्णालयातील यंत्रसामुग्रीयुक्त अद्ययावत करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.