गर्दुल्ल्यांकडून सहा जणांवर तलवारीने हल्ला
भाईंदर
: मीरा रोड परिसरात गर्दुल्ल्यांचा मोठा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. मीरा रोड येथील गीता नगर परिसरात नशा करण्यापासून या गर्दुल्ल्यांना मज्जाव केल्याने चार गर्दुल्ल्यांनी सहा नागरिकांवर तलवारीने हल्ला केला. यात सहाही जण जखमी झाले झाले असून नयानगर पोलीसांनी दोन गर्दुल्ल्यांना अटक केली आहे.
मीरा रोडच्या गीता नगर टप्पा आठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून गर्दुल्ले नशा करण्यासाठी बसतात. यासंदर्भात स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. पण कोणतही कारवाई करण्यात आली नाही. रविवारी संध्याकाळी एका इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच चार गर्दुल्ले नशा करण्यासाठी बसले होते. त्यात या चौघांचे एकमेकांशी भांडण सुरू झाल्याने इमारतीमधील रहिवाशांनी त्यांना हटकले आणि दूर जाण्यास सांगितले. त्यात गर्दुल्ले आणि इमारतीमधील काही रहिवाशांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात गर्दुल्ले निघून गेले आणि काही वेळांनी तलवारी घेऊन आले. त्यांनी तलवारीच्या सहाय्याने रहिवाशांवर हल्ला चढवला. त्यात सहा जण जखमी झाले. दोघांच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली आहे.