मुंबई विमानतळासाठी अदानी समूहाची घाई
गौतम अदानी समुहाने पाच सरकारी विमानतळांच्या खासगीकरणाची निविदा जिंकली आहे. त्याबरोबर कंपनीने विमानतळ क्षेत्रात उडी घेतानाच मुंबईचे विमानतळ ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी समूहाने तब्बल १० हजार कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे. पण सध्या विमानतळावर ताबा असलेल्या जीव्हीके समुहाचा त्याला विरोध आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळात सध्या जीव्हीके समुहाची सर्वाधिक ५०.५ टक्के भागीदारी आहे. एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिकेची १० टक्के तर बिडवेस्ट समुहाची १३.५ टक्के भागीदारी आहे. २६ टक्क्यांसह भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात केंद्र सरकार 'सायलेंट पार्टनर' आहे. या सर्वांची मिळून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) ही कंपनी सध्या विमानतळ चालवत आहे.
बिडवेस्टने त्यांचा हिस्सा १२४८ कोटी रुपयांना अदानी समुहाला विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळाचे एकंदर मूल्य आठ हजार कोटी रुपये निश्चित करून प्रती समभाग ७७ रुपये दराने ते १२४८ कोटी रुपये घेऊन मिआलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समुहाने मात्र केवळ १२४८ कोटी मिआलमध्ये न गुंतवता संपूर्ण विमातळच १० हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याची जोमाने तयारी सुरू केली आहे. असे होऊ नये यासाठी जीव्हीकेनेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कसेही करून अदानी समुहाला कंपनीपासून दूर ठेवावे, असा जीव्हीकेचा प्रयत्न आहे.
दरम्यान अहमदाबाद, तिरुअनंतपुरम, लखनऊ, जयपूर व मंगळुरू या पाच विमानतळांच्या विकासाच्या माध्यमातून अदानी समुहाने १८ हजार कोटी रुपये हवाई क्षेत्रात गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १० हजार रुपये ते मुंबई विमानतळात गुंतवणार आहेत, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.