आठ वर्षांनंतर डीएन नगरातील म्हाडा इमारतीला संपूर्ण ‘ओसी’!
म्हाडा इमारतींचे रखडलेले प्रकल्प आता हळूहळू पूर्ण होण्याच्या मार्गावर असून अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर या मोठय़ा वसाहतीतील एका इमारतीला ‘निवासयोग्य प्रमाणपत्र’ (ओसी) जारी करण्यात आले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर हक्काचे घर मिळणार असल्यामुळे ढोलताशांच्या गजरात रहिवाशांनी या घटनेचे स्वागत केले.
नियोजन प्राधिकरण म्हणून अधिकार मिळाल्यानंतर सव्वा वर्षांच्या काळात म्हाडाने ९० हून अधिक इमारतींना निवासयोग्य प्रमाणपत्रे जारी केली आहेत. पालिकेकडून यापैकी काही प्रकल्प ओसी मिळत नसल्यामुळे रखडले होते. डी एन नगर ही मोठी म्हाडा वसाहत असून या वसाहतीत म्हाडाच्या ४५ इमारती आहेत. या वसाहतीतील अनेक प्रकल्प रखडले होते. यापैकी काही प्रकल्पात रहिवाशांनी जबरदस्तीने घरांचा ताबाही घेतला आहे. मात्र प्रकल्प अर्धवट अवस्थेत असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या पाश्र्वभूमीवर जुन्या डी. एन. नगरातील एमआयजी वसाहतीतील सात क्रमांकाच्या इमारतीचा (तिरुपती सोसायटी) पुनर्विकास पूर्ण झाला असून इमारतीला म्हाडाने निवासयोग्य प्रमाणपत्रही जारी केले आहे. कॅसा डिव्हाईन असे या इमारतीचे नामकरण झाले आहे. विकासक प्लॅटिनम कॉर्प आणि रहिवाशांनी हा आनंद चक्क ढोलताशांच्या गजरात साजरा केला. रहिवाशांना चाव्यावाटपही करण्यात आले. रखडलेल्या पुनर्विकासामुळे रूक्ष झालेल्या डी. एन. नगर परिसराला त्यामुळे वेगळीच झळाळी आली.
म्हाडा प्रकल्प राबविण्यासाठी आपण आठ वर्षांपूर्वी डी. एन. नगरात आलो तेव्हा खूपच भयानक परिस्थिती होती. अनेक विकासक प्रकल्प अर्धवट अवस्थेत सोडून गायब झाले होते. अशावेळी यापैकी काही प्रकल्प रीतसर निविदेमार्गे आम्ही मिळविले. त्याच काळात विविध कारणांमुळे प्रकल्प पुढे सरकत नव्हते. रहिवाशांचे भाडे आम्ही सुरूच ठेवले होते. त्यापैकी एका प्रकल्पात लोकांना घरांचा ताबा देत आहोत ही आनंदाची बाब आहे, असे प्लॅटिनम कॉर्पचे विशाल रतनघायरा यांनी सांगितले.