ताजी बातमी

खार येथील पाच मजली इमारतीच्या जिन्याचा भाग मंगळवारी दुपारी अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका दहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या. तळमजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंतचा जिन्याचा भाग कोसळल्याने इमारतीत रहिवासी अडकले होते. अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी शिडी लावून या रहिवाशांची सुटका केली. ही धोकादायक इमारत आता पाडण्यात येणार असल्यामुळे रातोरात येथील रहिवासी रस्त्यावर आले आहेत.

खार जिमखानाजवळील १७वा रस्ता येथीलबोहाला अपार्टमेंटया पाच मजली इमारतीचा जिन्याचा भाग मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. ही इमारत खासगी असून ती ४७ वर्षे जुनी आहे. जिन्याचा भाग कोसळताच आसपासच्या इमारतीतील रहिवाशांनी इमारतीत अडकलेल्या रहिवाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळातच मुंबई अग्निशमन दलाच्या चार गाडय़ा, एनडीआरएफच्या दोन तुकडय़ा पोलीस यांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. शिडय़ांच्या मदतीने येथील २१ रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र दुर्घटना घडली तेव्हा इमारतीच्या आवारात खेळत असलेली माही मोटवानी (वय १०) हिच्या अंगावर ढिगारा कोसळून ती जखमी झाली, तर भावना वसंत अंचन (५०) आणि सुरेखा भानूसाहेब लोखंडे (४०) या दोन महिला जखमी झाल्या. यापैकी माहीला तातडीने लिलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अन्य दोन जखमी महिलांवर पालिकेच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळल्याने इमारत धोकादायक झाली आहे. इमारतच खचल्यामुळे इमारतीमधून सर्व रहिवाशांना बाहेर काढून जवळच्या पालिकेच्या शाळेत तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. मात्र घरांमध्ये लोकांचे महत्त्वाचे सामान अडकलेले असल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. जिने नसल्यामुळे सामान बाहेर काढायचे कसे, हा रहिवाशांसमोर प्रश्न आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात