‘गोल्ड एक्स्प्रेस’ फसवणूक १०० कोटींपुढे
ठाणे :गोल्ड एक्स्प्रेस फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत असून संचालक आमीन मलपरा आणि माजिद सेलिया दोन प्रमुख आरोपींसह दहा जणांविरुद्ध नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी केवळ दोन आरोपींना अटक झाली असून पोलिस कोठडीत असलेल्या या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. एक लाखाच्या गुंतवणुकीवर दरमहा चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून आरोपींनी पैसे उकळले. नंतर पैसे देण्याची वेळ आल्यानंतर ऑफिस बंद करून पळ काढला. आयुष्याची जमापुंजी गुंतवणारे गुंतवणूकदार चिंतेत असून मिरा-भाईंदर तसेच मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांनी या योजनेत पैसे गुंतवले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. दररोज १०० ते १२५ गुंतवणूकदार तक्रारीसाठी पोलिसांकडे धाव घेत असून आतापर्यंत एक हजार गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. फसवणुकीचा आकडा ३६ कोटींच्या घरात असला तरी आरोपींनी ३ हजार गुंतवणूकदारांची सुमारे १२५ कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक गुन्हे शाखा आरोपींच्या बँक खात्यांची माहिती घेत असून यामध्ये आरोपींची ११ बँकखाती असल्याची बाब पुढे आली आहे.