मोटरमन, गार्डमुळे जखमी प्रवाशाचे प्राण वाचले
रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या एका प्रवाशाच्या मदतीसाठी सीएसएमटी-ठाणे लोकलच्या मोटरमनने लोकल थांबवून मदत केल्याने त्याचे प्राण वाचले. सोमवारी रात्री सायन ते कुर्लादरम्यान घडलेल्या या घटनेत मोटरमनमुळे प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळू शकली.
मोटरमन के.बी. चौधरी सोमवारी रात्री सीएसएमटी ते ठाणे लोकलवर कार्यरत होते. सायन ते कुर्लादरम्यान रात्री पावणेदहाच्या सुमारास लोकल आली असता एक वीस वर्षीय तरुण अप धिम्या मार्गावरील रुळावर जखमी अवस्थेत पडला होता. हे पाहताच चौधरी यांनी आपत्कालीन ब्रेक दाबून लोकल थांबवली. गार्ड महेश के यांनी अन्य चार प्रवाशांच्या मदतीने त्या तरुणाला महिला डब्यात ठेवले. त्यानंतर याची कल्पना कुर्ला स्टेशनमास्तरांना देण्यात आली. कुर्ला स्थानक येताच त्या प्रवाशाला रेल्वे पोलीस व अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.