ऊर्मिला यांनी काँग्रेस सोडली
लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून राजकीय प्रकाशझोतात आलेल्या सिनेअभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षातंर्गत राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीवेळीच उर्मिला यांना मुंबई काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणाचा त्रास होत होता. याबाबत त्यांनी मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पक्ष लिहून संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण हे नित्याचे आहे. वेळोवेळी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत कल्पना देऊनही संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
ऊर्मिला मातोंडकर यांनी, मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून आपला राजीनामा दिला. तसेच, आपल्याला या पक्षात काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभारही मानले. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास काँग्रेसचे मुंबईतील दिग्गज नेते तयार नसताना ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी घरोघरी प्रचार करून मातोंडकर यांनी तुलनेने अत्यंत कठीण अशा उत्तर मुंबई मतदारसंघात आपली हवा तयार केली होती. भाजपचा गढ समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात मातोंडकर यांच्या प्रचारामुळे तेव्हा भाजपची दमछाक झाली होती. त्यामुळे राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या मातोंडकर यांना प्रचारासाठीही बोलविले जात होते. पण, अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी राजीमाना दिल्याने काँग्रेसला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.