म्हाडाकडून मुंबईकरांचा अपेक्षाभंग
म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांच्या अपेक्षेत असलेल्या मुंबईकरांना सोडतीसाठी काही वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागेल. सध्या म्हाडा प्राधिकरणाकडील गृहसाठा रोडावला असतानाच अनेक प्रकल्पही रखडल्याची भर पडली आहे. त्यामुळे पवई येथे ४५० आणि विरार येथे ५२० घरांची योजनेतून काही घरे हाती लागणार आहेत. मात्र पवईमधील ४५० घरांसाठी नुकताच निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया घेतली जाईल. त्यामुळे, या घरांच्या पूर्ततेसाठी किमान तीन वर्षे तरी जाणार असल्याने मुंबईकरांचे गृहस्वप्न तूर्तास स्वप्नच बनून राहिले आहे.
म्हाडाकडून मुंबईसह विविध विभागीय मंडळात घरे बांधली जातात. मुंबई वगळता अन्य मंडळात घरांच्या योजना आखल्या जाताना मुंबईकरांची परवड झाली आहे. यापूर्वी फक्त २१७ घरांची सोडत काढण्यात यशस्वी ठरलेल्या म्हाडाकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात घरांच्या सोडतीची घोषणा होण्याची अपेक्षा फोल ठरली. तुंगा, पवई येथे मध्यम उत्पन्न गटासाठी ४५०, विरार-बोळींज येथे अल्प उत्पन्न गटासाठी ५२० घरे बांधण्यासाठी निविदा मागवण्यास मान्यता देण्यात आल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी बुधवारी वांद्रेतील मुख्यालयात घोषणा केली. मुंबईत मोतीलाल नगर, पहाडी गोरेगावसारख्या विविध प्रकल्पांच्या पूर्ततेतून मोठ्या प्रमाणात घरे मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.